तासवडे टोलनाक्यावरील गुंडांची शिवसैनिकासह कुटूंबियांना बेदम मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, कराड, दि. ०४ : मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडून त्याच्यासह त्याच्या कुटूंबियांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना तासवडे टोलनाका येथे घडली असून, याप्रकरणी तळबीड पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन टोलनाक्यावरील गुंडांना मात्र अभय देण्याचे काम केले आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री असताना एका शिवसैनिकासह त्याच्या कुटूंबियांना मारहाण होते व त्याची दखल पोलीस घेत नसल्याने साताऱ्यासह मुंबईतील शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, मूळचे गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथील रहिवासी असणारे अरुण रामचंद्र फडके (वय 45) हे गेली अनेक वर्षे घाटकोपर (मुंबई) येथे वास्तव्यास असतात. काही दिवसांपूर्वी ते गडहिंग्लज येथील त्यांच्या मूळगावी आले होते. त्यानंतर मूळगावातून दि. 2 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. दरम्यान त्यांची कार (एमएच 03 सीबी- 1695) ही तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर आली असता ‘फास्टटॅग’ यंत्रणा असतानाही त्यांची कार अडवण्यात आली. यावेळी त्यांनी आमची स्वयंचलित ‘फास्टटॅग’ यंत्रणा बंद असल्याने आम्ही ‘मॅन्युअली’ ‘फास्टटॅग’ स्कॅन करतो, असे सांगून स्कॅनिंग मशीन गाडीच्या काचेवर आपटली. यानंतर काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्याठिकाणी स्कॅनिंग मशीन आपटले होते, त्याठिकाणी काचेला तडा गेल्याचे फडके यांच्या लक्षात आले. गाडीच्या वेगामुळे व हवेमुळे काच जास्त तडकून ती फुटली. त्यामुळे स्कॅनिंग मशीन आपटल्यामुळेच गाडीची काच फुटली आहे, याची खात्री झाल्यानंतर फडके यांनी तडक गाडी वळवून तासवडे टोलनाक्यावर आणली. यावेळी त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला तुमच्या कर्मचाऱ्याने काचेवर मशीन आपटल्यामुळेच काच फुटली असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पहायची मागणी केली. टोलनाक्यावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी यावेळी फडके यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला तुमच्या टोलनाक्यावरील तक्रार नोंदवही द्या, अशी मागणी केली असता टोलनाक्यावर कार्यरत असलेल्या शर्मा नावाच्या व्यक्तीने फडकेंना “तुमको ज्यादा चर्बी चढी है क्या”, असे म्हणत हिंदीतून फडके यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी फडके यांच्या पत्नी व मुलांनी फडकेंना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण, धक्काबुक्की करुन त्यांचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुन्हा इथे दिसलास तर तुमची खांडोळी करु, अशी धमकीही दिली. यानंतर अरुण फडके यांनी सरळ तळबीड पोलीस स्टेशन गाठून टोलनाक्यावरील व्यवस्थापक शर्मा तसेच इतर दहा ते पंधरा लोकांनी मला मारहाण करुन पत्नीसह मुलीचाही धक्काबुक्की करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिली. मात्र, तळबीड पोलीस स्टेशनच्या महिला अधिकाऱ्याने आमचे म्हणणे ऐकून न घेता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला. माझ्या गाडीचे नुकसान केले आहे, मला मारहाण करण्यात आली आहे. तसेच माझ्या पत्नी व मुलीला धक्काबुक्की करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर भादंवि प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असता तळबीड पोलिसांनी टोलनाक्यावरील गुंडांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे यासंदर्भात फडके यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून टोलनाक्यावरील व्यवस्थापक शर्मा व इतर दहा ते पंधरा गुंडांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री सेनेचा तरीही शिवसैनिकाला न्याय मिळेना

जिल्ह्यातील टोलनाक्यांवरील गुंडगिरी नित्याचीच झालेली आहे. राजकीय पुढारी टोलनाके चालवित असल्यामुळे अनेक नामचीन गुन्हेगारांना या टोलनाक्याचा आश्रय मिळाला आहे. जिल्ह्यातील आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर रोजच वादाचे आणि हाणामारीचे प्रसंग उद्भवतात. मात्र हे दोन्ही टोलनाके ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात, ते पोलीस मात्र अशा घटनांकडे कानाडोळा करतात. त्यामुळेच टोलनाक्यावर कार्यरत असणारे गुन्हेगार भलतेच शेफारले आहेत. रविवारी अरुण फडके या जुन्या पिढीतील शिवसैनिकासह त्याच्या कुटूंबाला तासवडे टोलनाक्यावर मारहाण झाली. परंतू पोलिसांनी केवळ एनसी वर भागवून त्यांना मुंबईकडे चालते केले. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. स्वत: शिवसेना सुप्रिमो मुख्यमंत्री आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री आहेत. असे असताना तासवडे टोलनाक्यावर शिवसैनिकालाच मारहाण होते, हे प्रकरण निश्चितच गंभीर असल्याने या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जातीने लक्ष घालून तासवडे टोलनाक्यावरील शर्माच्या व त्याच्या बगलबच्च्या गुंडांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील जुन्या कट्टर शिवसैनिकांनी केलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!