
स्थैर्य । सातारा । येथील त्रिभुवनतारक जैन मंडळ यांच्यावतीने खण आळी येथील जैन मंदिरात प्रत्येक शनिवारी अन्नघर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना केवळ पाच रुपयांत स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण देण्यास प्रारंभ झाला आहे.
या मंडळांच्या सदस्यांकडून दुपारी 12 ते एक या वेळेत जेवणाचे पार्सल उपलब्ध करून दिले जात आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे हीच खरी भक्ती आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून त्रिभुवन तारक अन्नघर या सेवाभावी उपक्रमाचा प्रारंभ केल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक जेवणाच्या पार्सलमध्ये चार चपात्या, एक भाजी आणि मसाला भात दिला जातो. वेळेअभावी, प्रवासात किंवा गरजेच्या वेळी कुणालाही उत्तम आणि सहज जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाच्या पहिल्या शनिवारी एकूण 62 जेवणाचे पार्सल तयार करून त्याचे वाटप करण्यात आले. हे अन्नदान नसून मानवतेची सेवा आहे. समाजासाठी, माणुसकीसाठी एक छोटंसं योगदान असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.