दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय वेदपाठक यांच्या नियोजनात फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे; त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मुधोजी कनिष्ठ विभागामार्फत दोन दिवसीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.
इयत्ता अकरावी व बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यामार्फत एकूण 34 फूड स्टॉल लावण्यात आले होते. सर्व स्टॉलला खवय्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले; या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी .एच. कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य संजय वेदपाठक यांनी कनिष्ठ विभागामार्फत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दाखवीत व पारंपरिक नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली.
या उपक्रमासाठी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एच. कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.संजय दीक्षित, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संजय वेदपाठक, महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता अकरावी व बारावी मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी व विध्यार्थिनी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.