तब्बल ५७० कुटूंबांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे किट; उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


‘सजाई’त आणखी ४० बेड वाढवणार

स्थैर्य, फलटण, दि. ०१ : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ८ मधील मोलमजुरी करणाऱ्या तब्बल ५७० कुटुंबांना या कडक लॉकडाऊनमध्ये पुरेल इतपत अन्नधान्य व भाजीपाला असणारे किट उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी दिले आहे. त्याचबरोबर सजाई गार्डन कोरोना हेल्थ केअर सेंटरमध्ये सध्या १०० बेड्स आहेत. त्यात आणखी ४० बेड वाढवण्याचा निर्णय भोईटे यांनी घेतल्याने या ठिकाणी आता १४० बेड्सचा सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार होणार आहे.

नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ८ मधून निवडून आलेले विद्यमान नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी आपल्या प्रभागातील मोलमजुरी करणाऱ्या ५७० कुटुंबांना ५ किलो गहू, ५ किलो ज्वारी, ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, २ किलो पोहे, १ किलो शेंगदाणा, १ लिटर तेल, २ किलो साखर, १ किलो कांदा लसूण चटणी असे ९ प्रकारच्या अन्नधान्यातील उपयोगी किराणामालाचे किट देण्याचे ठरवले आहे. तर २ किलो कांदा, १ किलो बटाटा, २५० ग्रॅम आले, २५० ग्रॅम लसूण, २ किलो टोमॅटो, १ किलो गवार, १ किलो कारल, १ किलो दोडका, २ नग कोबी, १ नग फ्लॉवर, १ किलो शिमला मिर्ची, अर्धा किलो शेवगा, ४ नग लिंबू, अर्धा किलो हिरवी मिर्ची असे एकूण १५ भाज्यांचे भाजीपाला किट देण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, सजाई गार्डन हेल्थ केअर सेंटरमध्ये सध्या १०० बेड्सचा सुसज्ज असा विलगीकरण कक्ष सुरु आहे. येथे कोरोनाबाधितांना सेवा देण्यात कसूर केला जात नाहीये. याच ठिकाणी आणखी ४० बेड्स वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!