रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । मुंबई ।  राज्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, सिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी रक्ताची नियमित गरज भासते. यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे. असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धतेसाठी कार्यआराखडा तयार करावेत, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन श्री.शिंगणे यांनी रक्तपेढ्यांना केले आहे.


Back to top button
Don`t copy text!