कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे पाळा – पालकमंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सांगली, दि.०६: कोरोनाची दुसरी लाट मोठी असून गंभीर आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्हा वासियांनी साथ द्यावी, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड-19 च्या उपचारांसाठी उपयोगात आणलेली सर्व हॉस्पिटल्स पुन्हा एकदा तयार ठेवावीत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. त्यामुळे बाधीत रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात बेड्स, औषधे व ऑक्सिजन यांचा साठा उपलब्ध ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी यंत्रणांना दिले. कोविड उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन असणारी रूग्णसंख्या, सद्यस्थितीत उपचाराखाली असणारे रूग्ण, चिंताजनक रूग्ण, कोरोना उपचारांच्या ठिकाणी उपलब्ध असणारा ऑक्सिजन साठा, पुरवठा, रेमडिसीव्हीरची उपलब्धता व अन्य औषधांची उपलब्धता आदि सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. कोविड उपचार सुरू असणाऱ्या ठिकाणी आणि परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस घेणे हा त्यावरचा मूळ उपाय आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये या ठिकाणी जावून नागरिकांनी लसकीकरण करून घ्यावे. 45 वर्षावरील सर्वांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या संकटापासून स्वत: आणि स्वत:चे कुटुंब मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा मदत करण्यासाठी तयार आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रातही आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, त्याचाही फायदा जनतेने घ्यावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता प्रति दिवस 15 हजारापर्यंत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लसीकरणासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत. जे कोणी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत त्यांनीही पुढे येवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!