दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । सातारा । सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. डीजे धारकांनी या आदेशाचे पालन करावे; अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई अटळ असल्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिला आहे.
फलटण येथे गणेशोत्सव मंडळाच्या आयोजित बैठकीत पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे बोलत होते. यावेळी फलटण शहरासह उपविभागातील गणेशोत्सव मंडळाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वीच्या व आजच्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त गावात डीजेचा वापर न करण्याबाबतची योजना राबवावी, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा आणि येणारा गणेशोत्सव शांततेत व आनंदाच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहनही बरडे यांनी केले. डीजे वापरणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाईसह कडक कारवाई करणार असल्याचे बरडे यांनी या वेळी सांगितले.
या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, कुठलाही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही बरडे यांनी यावेळी दिला.