
स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या आगामी निवडणुकीसाठी गट व गणांची आरक्षण सोडत दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत सातारा येथे, तर फलटण पंचायत समिती सदस्यांची सोडत फलटण येथे होणार असून, या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे किती गट आरक्षित होणार, यावर गेल्या महिन्याभरापासून विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत. काही जाणकारांच्या मते, तालुक्यातील दोन गट अनुसूचित जातीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. तर राजकीय वर्तुळात चार गट राखीव होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये साखरवाडी व गुणवरे गटांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.
प्रत्यक्ष आरक्षण सोडतीनंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार असले, तरी या चर्चेमुळे अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.