मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२३ । सातारा । राष्ट्रीय मतदानाच्या टक्केवारी पेक्षा जास्त मतदान कसे होईल याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे निवडणूक पूर्व आढावा  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे उपस्थित होते.

यावेळी श्री. देशपांडे म्हणाले की, मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. मतदार यादीची छाननी  करुन मयत मदारांना वगळण्यात यावे. यासाठी आवश्यक असल्यास संबंधितंना स्पीड पोस्टद्वारे नोटीस पाठवावी. प्रभाग‍ निहाय मेळावे घेऊन नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करावी. यामध्ये मतदार यादीचे वाचन करुन मतदार नोंदणीबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात. मतदान केंद्रासाठी पोलीस स्टेशन निहाय पाहणी करावी. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात.  18 ते 19 वयोगटातील मतदारांसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये मेळावे घेऊन विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी अर्ज भरुन घ्यावेत. तसेच महाविद्यालयामध्येच त्या अर्जाचे निराकरणासाठी यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी केल्या.  यावेळी त्यांनी तहसिलदार, बीएलओ व डेटा ऑपरेटर यांच्याही अडचणी जाणून घेतल्या.

या बैठकीस  मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार व बीएलओ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!