सज्जनगडावर बासरी वादन आणि छेडणार्‍या तारांनी बहरले सतार वादन


सज्जनगड – सतार वादन करताना सौ.कल्याणी देशपांडे तर बासरी वादन करताना अद्वैत काशीकर. (छाया – अतुल देशपांडे,सातारा)

स्थैर्य, 10 फेब्रुवारी, सातारा : सतारी सारख्या सुमधुर संगीत देणार्‍या वाद्यावर लीलया बोटे फिरवीत आणि तितक्याच तोडीची साथ बासरीवर करत कलाकारांनी सज्जनगडावरील गायन वादन सेवेची परिसीमा गाठली.
श्री समर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात भक्तनिवास येथे झालेल्या कार्यक्रमात सौ.कल्याणी देशपांडे यांनी सतारीवर छेडलेल्या तारा आणि अद्वैत काशीकर यांनी बासरीवर काढलेल्या सुमधुर धून या खरोखरच एक अव्वल दर्जाच्या कलाकारांची पेशकश अशा ठरल्या .
शाम कल्याण रागाने या वादन सेवेला सुरुवात होत.. जानकीनाथ.. ठुमक चलत रामचंद्र ..सादर होऊन.. राम का गुणगान करीये ..तसेच ..बाजे रे मुरलीया ..सादर झाली .श्री रामचंद्र कृपाळू भजमन.. सादर होऊन कानडी भाषेतील ..सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा.. रचना सादर करताना कलाकारांनी आपल्या साधनेची ओळखच उपस्थित श्रोत्यांना करून दिली.
यावेळी या दोन्ही कलाकारांना पखवाज यावर साथ प्रथमेश तारळकर यांनी केली, तर तबलासाथ तनय रेगे यांची होती. या बहारदार वादन सेवेचे प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक विघ्नेश जोशी यांचे निवेदनही तितकेच बहारदार असे सादर झाले .या सर्व वादक व निवेदकांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी रामनामी शाल ,समर्थ प्रसाद देऊन केला. यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली .कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!