मुंबईतील आंदोलकांसाठी फलटण तालुक्यातून मदतीचा ओघ सुरूच; अनेक गावांनी पाठवला भाकरी-ठेचा

झिरपवाडी, भाडळी, सोनवडी, सासकल गावांचा पुढाकार; दर दोन दिवसांनी मदत पाठवण्याचा निर्धार


स्थैर्य, फलटण, दि. १ सप्टेंबर : मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धे श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी फलटण तालुक्यातून मदतीचा ओघ अविरतपणे सुरू आहे. आज, तालुक्यातील झिरपवाडी, भाडळी बुद्रुक, सोनवडी आणि सासकल येथील मराठा समाज बांधवांनी आपली जबाबदारी म्हणून आंदोलकांसाठी भाकरी, ठेचा, फरसाण आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असे खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना केले आहेत.

मुंबईत आंदोलन करणाऱ्या आपल्या बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी गावागावांतील मराठा समाज स्वतःहून पुढे येत आहे. आज सकाळी या चारही गावांमधील समाज बांधवांनी एकत्र येऊन खाद्यपदार्थांची जुळवाजुळव केली आणि ते आंदोलनस्थळी पोहोचवण्याची व्यवस्था केली.

यापुढेही जोपर्यंत आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत दर दोन दिवसांनी आमच्या गावांमधून खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जाईल, असा निर्धारही यावेळी उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केला. तालुक्यातील अनेक गावे या साखळीत जोडली जात असून, आरक्षणाच्या लढ्याला गावागावांतून बळ दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.


Back to top button
Don`t copy text!