
दैनिक स्थैर्य । 27 मे 2025 । फलटण । ‘‘फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीला ओढ्यांमध्ये व नदीपात्रात झालेली अतिक्रमणे असून जर पूर परिस्थितीला कायमस्वरुपी रोखायचे असेल तर यावर तात्पुरती मलमपट्टी न करता पाझरतलाव, ओढा व नदीतील अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे’’, असे भाजपा कायदा आघाडीचे जिल्हा सहसंघटक अॅड. संदिप कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
अॅड. संदिप कांबळे यांनी नमूद केले आहे की, ‘‘ओढ्यांना व नदीला पूर यायचे मूळ कारण हे त्यामधील अतिक्रमण हे आहे. कोळकी येथील उदाहरण घ्यायचे झाल्यास कोळकीच्या ओढ्यामध्ये आतोनात अतिक्रमण झाले आहे. बुवासाहेब ओढ्याचा उगम ज्या पाझर तलावात होतो त्याच्यावरसुद्धा काही अधिकारी वर्गाला हाताशी धरुन पक्की घरे बांधण्यात आली आहेत. हे सर्व करुन शांत न बसता काही अधिकार्यांनी सदरील पाझर तलावच दुसर्या सर्व्हे नंबरमध्ये टाकला आहे. काही भूखंड माफियांनी नगर रचना विभागाचे नियम धाब्यावर बसवून कोळकीत छोटे रस्ते ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी साईडपट्ट्या व गटारे करण्याससुद्धा जागा शिल्लक नाही. त्यामुळे रस्त्यांनाही नद्यांचे स्वरुप येत आहे.’’
‘‘सदरहू बाब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आपण आणून दिली असून त्यांनी यावर अधिकारी वर्गाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे’’, असेही अॅड. संदिप कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.