स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२५: अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश झाला. ‘गोल्डन अॅरो’ म्हणून ओळखल्या जाणा-या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.
शिवांगी सिंह २०१७ साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुस-या बॅचमधील फायटर पायलट आहेत. वाराणासीच्या असलेल्या शिवांगी सिंह यांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अॅरो’च्या १७ व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.
नव्यानेच समावेश झालेल्या राफेल विमानांच्या वैमानिकांच्या चमूमध्ये हवाई दलातील महिला वैमानिकांची निवड करण्यात येणार असल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले होते. राफेल एक मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय फायटर विमान आहे.
२०१७ मध्ये भारतीय हवाई दलामध्ये रुजू झाल्यापासून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह या मिग-२१ बायसन विमानाच्या वैमानिक आहेत. राजस्थानातून त्या अंबालामध्ये दाखल झाल्या आहेत. राजस्थानामध्ये त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासोबत मिग-२१ बायसन विमान उडवले आहे. अभिनंदन वर्थमान यांनी २७ फेब्रुवारीला काश्मीरच्या आकाशात झालेल्या डॉगफाइटमध्ये पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडले होते.
वाराणसीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवांगी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्या नॅशनल कॅडेट कॉर्पमध्ये ७ यूपी एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. त्यानंतर २०१६ साली ट्रेनिंगसाठी एअर फोर्स अॅकेडमीत प्रवेश घेतला. भारतीय हवाई दलातील दहा महिला वैमानिकांनी सुखोई, मिग २९ यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.