स्थैर्य, जम्मू-काश्मीर, दि. 10 : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून इतर दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी घेरले आहे. दरम्यान, चकमक अद्यापच सुरूच आहे. शोपियां जिल्ह्यात आठवड्याभरात झालेली ही तिसरी चकमक आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आणि लष्कराचे 44 आरआर पथक आणि केंद्रीय राखीव सुरक्षा बल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी ही कारवाई केली. या पथकाने शोपियां जिल्ह्यातील सुगू हेंदमा या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या संयुक्त पथकाने संबंधित भागाला गराडा आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.
शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीची आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी रविवारी आणि सोमवारी झालेल्या चकमकींमध्ये एकूण 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याने आठवड्याभरात एकूण 11 दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला आहे.