दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । फलटण । शिंदेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलने सर्व १० जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
शिंदेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली., शिंदेवाडी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत विरोधी पॅनलने माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर आणि माजी आमदार सू. शं. तथा चिमणराव कदम यांच्या समर्थकांनी या तिघांचे फोटो वापरुन श्रीराम पॅनल या नावाने कपबशी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविली.
ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री खा. शरदराव पवार यांचे फोटो वापरुन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनल या नावाने घड्याळ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविली आणि सर्व १० जागा जिंकल्या आहेत.
सर्वसाधारण मतदार संघातील १७३ मतांपैकी ९ मते अवैध ठरली असून १६४ वैध मतांपैकी खालील प्रमाणे मते घेऊन सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
प्रकाश माणिकराव यादव ९९, रविंद्र निवृत्ती शिंदे ९८, हणमंत भाऊसाहेब यादव ९६, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे ९६, दशरथ आनंदराव खराडे ९२, तात्यासाहेब राजाराम शिंदे ९२, प्रदीप बापूराव शिंदे ९२, प्रल्हाद दत्तात्रय शिंदे ८९.
महिला राखीव मतदार संघातील १७३ मतांपैकी २ मते अवैध ठरली असून १७१ वैध मतांपैकी प्रतिभा राजेंद्र शिंदे १०० आणि यमुनाबाई सखाराम यादव ९४ मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग राखीव प्रवर्गातील उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सदर ३ जागा रिक्त राहिल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण कार्यालयातील सहकार अधिकारी रविंद्र इनामदार यांनी काम पाहिले, त्यांना सोसायटी सेक्रेटरी अमोल खलाटे यांनी सहकार्य केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, माजी चेअरमन शिवाजीराव यादव, शिंदेवाडीच्या सरपंच सौ. निर्मला अरुण शिंदे यांच्यासह अनेकांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले असून मतदार बंधू भगिनींचे आभार मानले आहेत.