स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । पुणे । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिकांची भेट घेतली व त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान सहायता निधीला ५० लाखांचा धनादेश

ध्वजारोहणानंतर राज्यपाल  श्री.कोश्यारी याना उरुळी कांचन येथील प्रयागधाम ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

रस्ता सुरक्षा मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे प्रादेशिक विभाग आणि शेखर नायडू मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीचा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही संस्था संजयकुमार नायडू यांनी हेल्मेट न घातल्याने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेला आपला मुलगा शेखर यांच्या स्मरणार्थ स्थापन केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवार वाडा येथे ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शनिवार वाडा येथे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नागरिक  उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!