
स्थैर्य, पाटणेवाडी, दि. 17 ऑगस्ट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटणेवाडी (ता. फलटण) येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या सीआरपीएफमध्ये हवालदार म्हणून कार्यरत असलेले भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना, आपणही याच शाळेत शिकल्याचा अभिमान वाटतो आणि शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन भीमराव कांबळे यांनी दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यायामाचे महत्त्व पटवून देत, देशसेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कैवल्य विजय बोरावके, ईश्वरी गणेश पवार आणि प्रणव प्रशांत जगताप यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी राज्य आणि विभागीय स्तरावर उत्कृष्ट क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विशाल शंकर हाळनोर, उपशिक्षक मतीन शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल सर्जेराव भांडवलकर, अंगणवाडी सेविका शोभा जाधव, युवा कार्यकर्ते श्रीकांत भांडवलकर, गणेश काळे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.