‘ध्वजदिन ही सैनिकांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । मुंबई । देशाचे जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करीत असल्यामुळे देश सुरक्षित आहे. अनेक जवान प्राणांची आहुती देतात तर कित्येक जवान जायबंदी होतात. सैन्य दलातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी, सेवानिवृत्त जवानांसाठी तसेच अपंगत्व आलेल्या जवानांप्रती सरकार आपले कर्तव्य करीत असते. परंतु सशस्त्र सेना ध्वजदिन ही समाजाला सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी ध्वज निधीला आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि १३) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे कार्यवाहू ध्वजाधिकारी व्हाईस एडमिरल कृष्णा स्वामिनाथन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. एच.एस. कहलों, एअर ऑफिसर कमांडिंग मेरीटाईम एअर ऑपरेशन्स शिव रतन सिंह, प्रधान सचिव सीमा व्यास, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव उपस्थित होते.

देशासाठी कार्य करताना जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व लष्कराच्या अधिकारी व जवानांना वीरमरण आले. सर्व देश या हुतात्मा अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.  यंदा कोरोना परिस्थितीमुळे सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पुरे झाले नसले तरीही कोरोना काळात लष्कर, प्रशासन, पोलीस, अधिकारी व समाजसेवकांनी चांगले काम केले असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सन २०२०-२१ या वर्षात निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.


Back to top button
Don`t copy text!