स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 7 : जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांत मोठी चकमक सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अजूनही चकमक सुरूच आहे. आज सकाळपासूनच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर रेबन गावात सुरू झालेला गोळीबार काही वेळासाठी थांबला होता. तो पुन्हा सुरू झाला आहे. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना शोधत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली.
सांगण्यात येते, की हिजबूलचा एक मोठा दहशतवादी गट सुरक्षा दलापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एका घरात जाऊन लपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबूलचे 5 ते 6 दहशतवादी घरात लपलेले होत. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काही इनपुट मिळाल्यानंतर पोलीस, लष्कराच्या 01 आर आर आणि सीआरपीएफने संयुक्त अभियान सुरू केले आणि शोपियांच्या रेबन गावाला घेरून तेथे शोधमोहीम सुरू केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यानेही दहशतवाद्यांशी चकमक उडाल्याची पुष्टी केली आहे.
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अद्याप दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरूच असल्याचे समजते. या भागात अद्यापही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे.