
दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । समाजाच्या प्रत्येक विभागासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वस्तू आणि सेवा उपलब्ध असतील याची निश्चिती करणारी अनेकविध तंत्रज्ञाने गेल्या काही दशकांत उदयाला आली आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक समावेशन म्हणजे, वित्तीय सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध राहतील आणि केवळ उच्च पतधारक व्यक्ती/कॉर्पोरेट्सपुरत्या मर्यादित राहणार नाहीत, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे, होय. लोकांच्या भांडवल बाजारातील सहभागावर परिणाम करणारे अनेक अडथळे व मर्यादा असू शकतात (उदाहरणार्थ, निधीचा किंवा ज्ञानाचा अभाव). मात्र, आर्थिक समावेशनामुळे असे अडथळे नाहीसे करण्यात मदत होते आणि लोक भांडवल बाजारात मुक्तपणे प्रवेश करू शकतात.
भांडवली बाजारांतील आर्थिक समावेशाला चालना देण्यामधील तंत्रज्ञानाची भूमिका दुर्लक्षिता येणार नाही. एका अहवालानुसार (report), देशातील एकूण व्यक्तिगत गुंतवणूकदारांची संख्या आर्थिक वर्ष २१ मध्ये सुमारे १४२ लाखांनी वाढली आहे. यापैकी बहुतेक गुंतवणूकदार मोबाइल अॅप्लिकेशन्सद्वारे बाजारात प्रवेश करतात. भांडवल बाजारात आर्थिक समावेशनाला चालना देणा-या पाच तंत्रज्ञानाबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.
हॅण्डहेल्ड उपकरणे, वेगवान इंटरनेट आणि ब्रोकरेज अॅप्समध्ये झालेली उत्क्रांती: गेल्या काही वर्षांत, विशेषत: गेल्या दशकभरात, मोबाइल तंत्रज्ञानांनी आर्थिक समावेशनाला चालना दिली आहे. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचे श्रेय मोबाइल अॅप्लिकेशन्सना द्यावे लागेल. ही अॅप्लिकेशन्स वापरास सुलभ व प्रभावी असतात. गुंतवणूकदारांना शेअर बाजारांतील व्यवहारांमधील पारदर्शकतेच्या अभावाबद्दल चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण प्रत्येक गोष्ट तात्कालिक तत्त्वावर (रिअल-टाइम) घडते. याशिवाय, वेगवान इंटरनेट व कार्यक्षम स्मार्टफोन्स उदयाला आल्यामुळे तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अखेरच्या वापरकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी भांडवल बाजारातील मध्यस्थ यंत्रणांमध्ये झालेल्या कोणत्याही सुधारणेचा लाभ सर्वांना मिळतो. ही अॅप्स सहसा एकात्मिक (इंटिग्रेटेड) असतात. त्यामुळे ट्रेडर्सना अनेकविध शेअर्स, डिबेंचर्स आणि डेरिएटिव्ह्ज अशा अनेकविध सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्याची संधी मिळते.
बायोमेट्रिक उपकरणे: भांडवल बाजारांमध्ये दीर्घ मेहनतीची भूमिका खूपच निर्णायक आहे. सेबी, आरबीआय आणि शेअर बाजार अशा अनेक नियामक यंत्रणांमुळे, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आणि ब्रोकरेज हाउसेससाठी वापरकर्त्यांच्या तपशिलांचा माग ठेवणे अत्यावश्यक ठरते. बायोमेट्रिक उपकरणे डिजिटल साधनांमार्फत केवायसी करून घेणे व कागदाचा वापर लक्षणीयरित्या कमी करणे यांसाठी उपयुक्त ठरतात. भारताच्या संदर्भात बोलायचे तर, संपूर्ण डिमॅट खात्याच्या दस्तावेजांची पडताळणी व प्रक्रिया यांसाठी लागणारा वेळ यूआयडीएआयमुळे खूपच कमी झाला आहे. म्हणूनच ब्रोकरेज खाते काही मिनिटांमध्ये ट्रेडिंगसाठी सज्ज होऊ शकते.
डेटा अॅनालिटिक्स: डेटा अॅनालिटिक्स हे यांत्रिक प्रक्रिया व अल्गोरिदम्सचा वापर करून डेटाचे विश्लेषण करण्याचे तसेच त्यातून नमुने तयार करण्याचे शास्त्र आहे. अशा पद्धतींद्वारे पुरवण्यात आलेल्या माहितीमुळे एकंदर निर्णयप्रक्रियेत सुधारणा होते. भांडवली आणि वित्तीय बाजारांच्या संदर्भात, डेटा अॅनालिटिक्स क्लाएंट्सना सेवा देण्यात उपयुक्त ठरते. गुंतवणूक शैलींची पुनरावृत्ती करण्यात तसेच फ्युचर ट्रेड्स सुलभ करण्यात डेटा अॅनालिटिक्सची मदत होते. डेटा अॅनालिसिस आणि रिपोर्टिंग प्रक्रिया आता अधिक जलदही झाल्या आहेत. डेटा अॅनालिटिक्समुळे भविष्यकालीन अंदाज बांधून अध्ययन करण्याची सुरुवात झाली आहे आणि त्याद्वारे भूतकाळातील व्यवहार व बाजारातील माहिती यांच्या आधारे सल्ला पुरवणेही शक्य होत आहे.
रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन: आरपीए (रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन) हे एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान, मानवी कृतींचे विश्लेषण करण्यात तसेच डिजिटल प्रणाली व प्रोग्राम्स यांच्यातील आंतरक्रियांमार्फत त्यांचे अनुकरण करण्यात उपयुक्त ठरणारे बोट्स उभारण्यात, मदत करते. डेटा आयडेंटिफिकेशन व एक्स्ट्रॅक्शन यांसारखी अनेक कामे बोट्समार्फत, जलद गतीने तसेच मानवी चुकांची संभाव्यता कमी करून केली जातात. एंटरप्राइजच्या विविध कार्यात्मक क्षेत्रांमध्ये स्वयंचलन (ऑटोमेशन) आणण्यात आरपीए मदत करते. एकसुरी कामे काढून टाकली गेल्यामुळे कर्मचारी अधिक कल्पकतेने काम करू शकतात. यापुढे जाऊन आरपीए कंपनीची नफा कमावण्याची क्षमता व कार्यक्षमता सुधारण्यात मदत करते.
भांडवल बाजार संस्थांबाबत बोलायचे तर, आरपीए व्यवहारांना लागणारा कालावधी कमी करण्यात उपयुक्त ठरते तसेच व्यवहारांची माहिती देणे, समेट घडवून आणणे व पेमेंट प्रक्रिया निकाली काढणे यांसारख्या क्षेत्रात वापरले जाऊ शकते. या प्रक्रियेमुळे खूप वेळ वाचवला जाऊ शकतो आणि नवीन क्लाएंट्स बोर्डावर आणणे, समेट तसेच रिपोर्टिंग या महत्त्वाच्या कामांमध्ये मानवी चुका टाळता येतात. नवीन ट्रेडिंग खाते उघडणे, निधीची भर घालणे तसेच नफा काढून घेणे यांसारख्या पूर्वी वेळखाऊ असलेल्या प्रक्रिया यामुळे वापरकर्त्यांसाठी खूपच सुलभ झाल्या आहेत. याशिवाय या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण ट्रेडिंग अनुभव अधिक खात्रीशीर व पारदर्शक झाला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग ही कंप्युटर सायन्सच्या क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञाने आहेत आणि परस्परांशी संबंधित आहेत. व्याप्तीच्या दृष्टीने बघितल्यास एआय ही अधिक व्यापक संकल्पना आहे आणि मानवाची विचारक्षमता व वर्तनाची प्रतिकृती तयार करणारी बुद्धिमान यंत्रे निर्माण करणे एआयचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या बाजूला, मशिन लर्निंग हा एआयचा एक उपसंच आहे. यामध्ये यंत्रे त्या हेतूने स्पष्टपणे प्रोग्राम न करताही मानवी कृतींची किंवा अन्य प्रक्रियांची नक्कल करतात. सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स अधिक अचूक राखण्यात आणि कोणत्याही प्रोग्रामिंगशिवाय अधिक चांगल्या रितीने अंदाज बांधण्यात ही दोन्ही तंत्रज्ञाने मदत करतात.
एआय आणि मशिन लर्निंगच्या माध्यमातून ग्राहक नातेसंबंधांचे व्यवस्थापन खूपच सुधारले आहे. सल्लागार सेवा व जोखीम व्यवस्थापन ही दोन क्षेत्रेही या दोन तंत्रज्ञानांमुळे खूप सुधारली आहेत. हायब्रिड रोबोट अॅडव्हायजर्स (Hybrid robot advisors) मानवी वित्तीय सल्लागार आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापकांमध्ये आंतरक्रिया शक्य करतात आणि अधिक जटील कामे पार पाडली जातात.
सारांश: भांडवल बाजारात सहभाग घेणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमधून आर्थिक समावेशनाला चालना देण्यातील तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट होते. या तंत्रज्ञानांनी एकत्रितपणे भांडवली बाजारांतील पारदर्शकता सुधारली आहे आणि वैधतेच्या समस्यांचेही निराकरण केले आहे. तंत्रज्ञानात अपेक्षेप्रमाणे अधिक सुधारणा होत गेल्यास, आर्थिक समावेशनाचा स्तरही उंचावेल.