निनामचे पाच विद्यार्थी जाणार इस्त्रो सफरीवर


स्थैर्य, 27 फेब्रुवारी, सातारा : निनाम (ता. सातारा) येथील पाच विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथील सहलीसाठी निवड झाली आहे. याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांची ’आविष्कार’ अभियानांतर्गत राज्याबाहेरील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती अन् वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शासनातर्फे इस्त्रो सहल आयोजित करण्यात येते. आधुनिक विज्ञान अन् तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रातील संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठीही हा उपक्रम प्रेरक मानला जातो. त्यात विनीत जाधव, अंतरा जाधव, दर्श शिंदे, शुभ्रा महाडिक, निरंजना वाटांबळे हे विद्यार्थी इस्रो सफरीचे मानकरी ठरले आहेत.

शंभूराज चव्हाण, स्वरा जाधव या दोघांची राज्याबाहेरील विशेष शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक नंदकुमार कदम, मुख्याध्यापिका संगीता घोरपडे तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे, विस्तार अधिकारी शशिकला जगताप, केंद्रप्रमुख सुनीता शेडगे तसेच ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शाळेचे कौतुक केले आहे.

सहभागी विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॉकेटचे प्रक्षेपण पाहणे अन् अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी लाभणार आहे. विज्ञानविषयक कार्यशाळा, शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षणाचाही लाभ होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!