
स्थैर्य, बारामती, दि. 20 ऑगस्ट : जिल्हा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेतून पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत कार्तिकी शिंदे, सोहेल खान, सार्थक ताकमोगे, सुकृत तुपे आणि संकुल देवकर यांनी आपल्या उत्तम कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. क्रीडा प्रशिक्षक अशिष डोईफोडे व प्रियांका भोर यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा सौ. रेश्मा गावडे, संचालिका सौ. पल्लवी सांगळे, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेतही ते यशाची परंपरा कायम ठेवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.