
स्थैर्य, फलटण : गतवर्षी नवरात्रामध्ये झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन दोन कुटूंबात झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. धुळदेव ता. फलटण येथे ही घटना घडली असून या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आकाश पोपट पवार वय २५ रा. धुळदेव हे सोमवार दि. १७ अॉगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान घरातील ओट्यावर बसले होते. तेव्हा तुम्ही का हसला या कारणावरुन बाबा अनंता धुमाळ, लखन प्रकाश धुमाळ, विशाल बाबा धुमाळ, अभिषेक ज्ञानेश्वर भोसले, प्रसाद बाबा धुमाळ, प्रकाश अनंत धुमाळ, पिंटू सोपान भोसले, बिनू सोपान भोसले सर्व रा. धुळदेव यांनी लोखंडी रॉड, काट्यांनी पवार व त्यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी आकाश पवार यांनी फिर्याद दाखल केली असून तपास पोलीस हवालदार भोईर करीत आहेत.
याच प्रकरणी बाबा अनंत धुमाळ वय ४० रा. धुळदेव हे सोमवार दि. १७ अॉगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास देवाच्या बगाडाजवळ पवार यांच्या घराजवळून पायी जात असताना सनी पोपट पवार, सोनू बाळू पवार, वैभव बाळू पवार, आकाश पोपट पवार, पोपट हिरालाल पवार, बाळू हिरालाल पवार सर्व रा. धुळदेव यांनी धुमाळ यांना कोयत्याने व इतरांनी हाताने लाथाबुक्क्यांनी व भांडणे सोडवण्यास गेलेल्या पत्नी, भाचा, पुतणी व भावजय यांनाही काठीने मारहाण केली. या प्रकरणी बाबा धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार येळे करीत आहेत.