वाहनास धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकच्या काचा फोडून व ट्रक चालक व क्लिनर यांना मारहाण करून 19 हजार, मोबाईल व कपड्याच्या बॅग असे साहित्य लुटून नेणार्‍या पाचजणांना अटक


 

स्थैर्य, सातारा, दि.२७: वाढे, ता. सातारा येथे वाहनास धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकच्या काचा फोडून व ट्रक चालक व क्लिनर यांना मारहाण करून 19 हजार, मोबाईल व कपड्याच्या बॅग असे साहित्य लुटून नेणार्‍या पाचजणांना सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या डी. बी. पथकाने दोनच तासात जेरबंद केले. शुभम अनिल रसाळ रा. पाटखळमाथा, ता. सातारा, यशवर्धन दिपक पवार रा. गोडोली, ता. सातारा, अभिषेक लक्ष्मण फडतरे, रा. सदरबझार, सातारा, रोहीत राजेंद्र रसाळ रा. बोरखळ, ता. सातारा, शैलेश काशिनाथ पवार रा. गुरुवार पेठ, सातारा अशी संशयीतांची नावे आहेत. 

याबाबत माहिती अशी, वाढे ता. सातारा गावच्या हद्दीतील लोणंदकडे ट्रकच्या चालकास चारचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरुन चारचाकी वाहनातील अनोळखी युवकांनी ट्रकचालकास व क्लिनर यास मारहाण केेली व ट्रकाची समोरील काच फोडली. यानंतर त्यांच्याकडील रोख 19 हजार रुपये, दोन मोबाईल व दोन कपड्याच्या बॅग असे साहित्य जबरदस्तीने लुटून पळुन गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने तत्काळ तपास करत एका संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चार साथिदारांची नावे सांगितली. त्यावरुन या गुन्ह्यातील उर्वरित चौघांना जेरबंद करत पोलिसांनी रोख रक्कम, गुन्ह्यातील चारचाकी वाहन, मोटरसायकल हस्तगत केली. संशयीत अनोळखी असल्याने व कोणतीही तांत्रिक माहिती नसतानाही अवघ्या दोन तासांत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने गुन्हा उघडकीस आणल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. 

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहा. पोलीस अधिक्षक समीर शेख, पोलीस निरिक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, पो. ना. सुजित भोसले, पो. कॉ. नितीराज थोरात, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतिश पवार, पो. कॉ. उदयसिंह पावरा, पो. हवालदार नरेंद्र मोरे, पो.ना. हेमंत ननावरे यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!