दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । सातारा । कराड अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या तारण घर मिळकतीत घुसल्याप्रकरणी पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय दिघे, रंजना दिघे, विलास दिघे, सुनीता दिघे व विजय दिघे यांची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून या सर्वांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सचिन सुधाकर कोडगूले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित तारण घर कराड अर्बन बँकेच्या ताब्यात आहे. सोमवार, दि. २0 रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दौलतनगर (करंजे, सातारा) येथे बँकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतीत संशयित विजय विलास दिघे, रंजना बाबूराव दिघे, विलास बाबूराव दिघे, सुनीता विलास दिघे व विजय दिघे यांची पत्नी (सर्व रा. दौलतनगर) अनधिकृतपणे घुसले. येथे असणारे बँकेचे सुरक्षारक्षक शंकर खरात यांनी या संशयितांना येण्यास मज्जाव केला. तरीही या संशयितांनी बँकेने सील केलेली सर्व कुलपे कटरच्या सहाय्याने तोडून बँकेचा कब्जा असलेल्या घरात घुसखोरी केली. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार चव्हाण तपास करत आहेत.