सोनवडी बुद्रुक येथील सामूहिक अत्याचार प्रकरणी कोळसा भट्टीच्या मालकासह पाचजण ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२३ | फलटण |
कोळसा भट्टीवर काम करणार्‍या सोनवडी बुद्रुक (ता. फलटण) या गावातील एका महिलेवर १९ जून रोजी कोळसा भट्टीच्या मालकासह पाचजणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचारित महिला जांभूळपाडा (जि. रायगड) जवळील वांद्रोशी गावातील कातकरी समाजातील आहे. कोळसा भट्टीचा मालक हसन लतिफ शेख याच्यासह पाचजणांनी हे दुष्कृत्य केले असून यावेळी महिलेच्या पतीला बाजूला असलेल्या झोपडीत डांबून ठेवले होते, तर अन्य कातकरी कुटुंबांना बाहेर आल्यास ठार मारू, अशी धमकी नराधमांनी दिली होती. दरम्यान, या प्रकरणी फलटण पोलिसांनी आरोपी हसन शेख याच्यासह पाचजणांना ताब्यात आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, पीडित महिला कातकरी समाजातील असून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात राहते. ही महिला २८ वर्षांची असून तिला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. पीडित महिला, तिचा पती, सासू-सासरा आणि मुले हे फलटण तालुक्यातील एका कोळसा कारखान्यात कामाला आले आहेत. अत्याचारानंतर पीडित महिलेला त्या पाच नराधमांनी मारहाण केली आहे. त्यावेळी महिलेने बेशुध्द पडल्याचे नाटक केले. त्यानंतर ते पाच नराधम झोपडीतून निघून गेले. या संधीचा फायदा घेऊन ती महिला झोपडीतून बाहेर आली आणि सकाळी ६ वाजेपर्यंत शेजारच्या उसाच्या शेतात लपून बसली. सकाळी तिचा पती शोधत आल्यानंतर ती उसाच्या शेतातून बाहेर आली.

दरम्यान, पीडित महिलेच्या दोन मुलांना हसन शेखने त्याच्या घरी डांबून ठेवले होते. शेख आपल्याला ठार मारेल, या भीतीने घाबरलेली पीडित महिला, तिचा पती आणि पाच वर्षांची मुलगी यांनी त्या कोळसा भट्टीवरून बाहेर पडून बसने पंढरपूरला आले. तेथून रेल्वेने लोणावळ्यास गेले. पैसे संपल्याने तेथे दोन दिवस बिगारी म्हणून काम करून एक हजार रुपये मिळविले. त्या पैशातून जांभूळपाड्याजवळच्या मुळशी गावात काकांच्या घरी ते सर्वजण पोहोचले. पीडितेच्या काकांनी घडलेला प्रकार शेजारी असलेल्या आडोशी गावात राहणार्‍या श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते रमेश वाघमारे यांना सांगितल्यानंतर त्यांनी या दाम्पत्याला विरार जवळच्या उसगाव येथील संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्याकडे नेले.

विवेक पंडित यांनी पाठपुरावा केल्यानंतर पीडितेचा जबाब मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी नोंदवून घेतला. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी पीडित महिलेला आणि तिच्या पतीला सातारा येथे तक्रार दाखल करण्यासाठी नेले असल्याची माहिती विवेक पंडित यांनी दिली आहे.

अत्याचाराच्या घटनेने जिल्हा हादरला
सोनवडी बुद्रुक येथे कोळसा भट्टीवर काम करणार्‍या कातकरी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडल्याचे समजताच फलटण तालुक्यासह सातारा जिल्हा हादरला आहे. या घटनेतील कोळसा भट्टीचा मालक हसन लतिफ शेख व अन्य चार नराधम यांना फलटण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नराधम हसन शेखने पीडित महिलेचा पती व मुलांचाही छळ केल्याचे समजते. आजही समाजात कष्टकरी, गरीब महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेणारे नराधम आहेत. त्यामुळे अशा महिला किती सुरक्षित आहेत, हा प्रश्न उभा राहतो. अशा नराधमांना कायद्याने कठोरातली कठोर शिक्षा ताबडतोब देऊन अशा घटना घडू नये, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत.


Back to top button
Don`t copy text!