स्थैर्य, सातारा, दि. 17 : साताऱ्यातील बर्थ डे बॉय व त्याच्या साथीदाराला शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोयते व तलवार असा घातक शस्त्रांचा साठा जप्त करुन टोळीस अटक केली. सध्या आरोपीचे रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. यामुळे आनंदात वाढदिवसाचा केक खाण्यापेक्षा पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.
या गुन्ह्यात बिर्थ डे बॉय आदिल अस्लम शेख (वय- 26 वर्षे), शादाब अय्याज पालकर (वय -20 वर्षे), मिजान निसार चौधरी (वय -30 वर्षे), तोसिफ अजिज कलाल (वय -26 वर्षे), शादाब अस्लम शेख (वय -25 वर्षे), समीर अस्लम शेख सर्व रा.दस्तगीर कॉलनी, 666, मंगळवार पेठ, सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा विभागाचे सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दस्तगीर कॉलनीमध्ये एक बर्थ डे बॉयने वाढदिवसा दिवशी कोयत्याने केक कापून दहशत पसरविली असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार सदर इसमांची माहिती काढुन पुढील कारवाई करणेबाबत त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे शाहुपुरी गुन्हे शाखेचे पथकाला खबऱ्याकडून घातक शस्त्रांबाबत माहिती घेतली.
त्यानुसार सातारा शहरातील मंगळवार पेठेत दस्तगीर कॉलनीमध्ये राहणारा बर्थ डे बॉय व त्याचे इतर साथीदारांनी कोयते व तलवारी अशा घातक शस्त्रांचा अवैध शस्त्र साठा केला आहे व त्याचे वाढदिवसानिमित्त साथीदारांसह दस्तगीर कॉलनीमध्ये कोयत्याने केक कापुन दहशत केली आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर स.पो.नि.विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करुन त्यांना कारवाईबाबत मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. त्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेने बर्थ डे बॉयचे सेलेब्रेशनच्या फाटोवरुन त्याची व त्याच्या साथीदारांची ओळख पटवुन घेतली.
सदर गुन्हे शाखेचे पथकाने दस्तगीर कॉलनीमध्ये अचानक छापा टाकुन संबंधित बर्थ डे बॉय व त्याच्या इतर 4 साथीदारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली. सदर युवकांनी सातारा शहरात दहशत पसरविणेसाठी त्यांचेजवळ 4 मोठे कोयते व 1 तलवार असा घातक शस्त्रांचा साठा घराजवळ केला असल्याची कबुली दिली. पाचही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेसह त्यांचा एक फरारी साथीदार यांचेविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पो. हेड कॉ. सुनिल मोहरे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो.कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, राहुल चव्हाण व समीर मोरे यांनी केली आहे.