
![]() |
घिगेवाडी (ता.कोरेगाव) येथे कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याने पोलिसांनी गावचे प्रवेशद्वार बंद केले |
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. ०९, (रणजित लेंभे) : घिगेवाडी (ता.कोरेगाव) येथे मुंबईहून (बदलापुर) आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पती, पत्नी, दोन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे.
पाच जूनच्या रात्री हे सर्वजण बदलापूरहून गावी आले होते. सर्वांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णाच्या घरापासून अर्धा किलो मीटरचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला असून पोलिस व प्रशासनाने आज दुपारी हे गाव सील केले आहे. सोनके, वाघोली व पिंपोडयानंतर आता जेमतेम सव्वाशेच्या आसपास उंबरठा असणाऱ्या या छोट्याशा वाडीत मुंबईकरांमुळे कोरोनाची एन्ट्री झाली आहे. मुंबई-पुणे येथे कोरोनाने थैमान घातल्याने आता अनेकजण गावाकडे पळू लागले आहेत. संबधित रुग्णाच्या पत्नीला सर्वप्रथम त्रास जाणवत होता. त्यामुळे सर्वांनाच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाने पाठवलेल्या स्वेबचा रिपोर्ट काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. दरम्यान महिलेचा पती पिंपोडयाच्या बसस्थानक परिसरातील एका मेडिकल व फळांच्या स्टॉलवर येऊन गेल्याने या दोघांनाही क्वारंटाइन होण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य व महसूल विभागाने ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या. दरम्यान संबधित कुटुंबाने विनापरवाना प्रवास करत जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ग्राम दक्षता समितीने त्यांच्याविरोधात वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या कुटुंबातील तिघांना मुंबईतच कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यांनी खासगी लेब मध्ये कोरोनाची टेस्ट केली होती. तरीही ती माहिती लपवून हे भितीपोटी गावी आल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.