
स्थैर्य, नागठाणे, दि. 2 : मापरवाडी (ता. सातारा) येथील विठ्ठल रामचंद्र चव्हाण यांच्या पाच शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या. वन विभागाचे परिमंडळ अधिकारी योगेश गावित, महेश सोनवणे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तेथे मिळालेल्या पायाच्या ठशावरून बिबट्याने हा हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विकास अधिकारी व्ही. एस. सावंत, बलदेव निकम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. सरपंच सुजाता चव्हाण, पोलिस पाटील सारिका चव्हाण, मुगूटराव चव्हाण यांनीही घटनास्थळास भेट दिली. वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना दक्ष राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त झालेल्या चव्हाण यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचीही हमी या वेळी देण्यात आली.