
स्थैर्य, दहिवडी, ता. २२: सध्या अतिशय भयावह परिस्थिती असून ऑक्सिजन अभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. पण कुकुडवाड गटातील कोणावरही अशी वेळ येवू नये म्हणून देसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागाकडे पाच जंम्बो ऑक्सिजन सिलेंडर सर्व मशीनसह मदत म्हणून देण्यात आले आहेत असे प्रतिपादन सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या पुळकोटी (ता. माण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देसाई उद्योग समूहाकडून पाच जंम्बो ऑक्सिजन सिलेंडर सर्व मशीनसह मदत म्हणून देण्यात आले. त्याप्रसंगी श्री देसाई बोलत होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर, वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, जालिंदर खरात, तानाजी काळेल, जांभुळणीचे सरपंच भोजलिंग काळेल, शहाजी काळेल, गणेश माने, समीर ओंबासे, डाॅ. योगेश कुलकर्णी, अजित काळेल आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल देसाई म्हणाले की ग्रामीण भागातील जनतेने अतिशय काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वतःची काळजी घ्या म्हणजे समाजाची काळजी घ्याल. हा आजार निदर्शनास आल्यास आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधा. कोणीही आजार लपवू नका, योग्य उपचाराने हा आजार बरा होतो. ग्रामीण भागातील जनतेचे योग्य उपचार व सोयी सुविधा अभावी हकनाक बळी जावू नयेत म्हणून देसाई उद्योग समूहाकडून ऑक्सिजन सिलेंडरची मदत करण्यात आली आहे.
डाॅ. कोडलकर म्हणाले की सध्या सर्वत्र ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे उपचार करताना आम्हाला मर्यादा येत आहेत. पण देसाई कुटुंबियांनी दिलेल्या मदतीमुळे रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. या सिलेंडरच्या माध्यमातून एकावेळी किमान दहा रुग्णांवर या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करता येणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू होणार नाही. कुकुडवाड गटातील गंभीर रुग्णांना ही ऑक्सिजनची सुविधा येथेच देता येईल.