राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०१: मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छीमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशानुसार, दि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 कलम 14 अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!