विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय करीत असल्याच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यात विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असून त्या समितीने शासनाला शिफारशी सादर कराव्यात असे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

नवी मुंबईतील  परप्रांतीयाकडून  विनापरवाना मच्छी  विक्री करण्यात येत असल्याबाबत विजय उर्फ भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार  बोलत होते.

मासेमारी विक्री परवाने ‘मनपा’कडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिले जातात.विना परवाना मासे विक्री होत असल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून मनपा आयुक्तांना  या अनुषंगाने उचित कार्यवाही आणि कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येतील. या संदर्भातील नियम अवलोकन करण्यासाठी विधानपरिषद सदस्यांची समिती तयार करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

या प्रश्‍नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!