दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । मुंबई । कोकण किनारपट्टीतील समुद्र तसेच नद्यांच्या जल प्रदुषणातील वाढ रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. समुद्र तसेच नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे जल प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदुषणासंदर्भातील नियमावली आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर परराज्यातील मच्छिमार राज्यात येऊन मासेमारी करतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कठोर करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात तसेच माश्यांच्या उत्पादनासंदर्भात तक्रारी प्राप्त होताच मत्स्यव्यवसाय विभाग कार्यवाही करत असतो. सन 2019 मध्ये एक तक्रार प्राप्त झाली होती. मात्र त्या तक्रारीत काही तथ्य आढळून आले नाही. सन 2020 मध्ये 19 कंपन्यांना तसेच 2021 मध्ये 18 कंपन्यांना क्लोजअप नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मच्छिमारीला कृषीचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्याने करण्यात येत आहे. तसेच माशांच्या उत्पादन वाढीसाठीही विविध प्रयत्न करीत असल्याचेही श्री.शेख यांनी सांगितले.
यासंदर्भात विधान परिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, रमेशदादा पाटील, प्रसाद लाड, महादेव जानकर, प्रविण दरेकर, ॲड मनिषा कायंदे यांनी प्रश्न विचारला होता.