दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । फलटण । मत्स्यशेती ही सध्याच्या काळामध्ये रोजगाराच्या तसेच उद्योगाकतेच्या दृष्टीने नवनवीन संधी उपलब्ध करून देणारा पर्याय आहे. मत्स्यशेतीतील संरचना आपण समजून घेतलीत, तर कमी जागेमध्ये सुद्धा जास्त उत्पन्न घेऊ शकतो. मत्स्यशेती करिता शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, त्या योजनांचा वापर करून नक्कीच आपण मत्स्यशेती प्रकल्प चांगल्या पद्धतीने उभारू शकतो, असे मत सांगली जिल्ह्याचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्रीकांत वारूंजीकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग व अग्रणी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने “मत्स्यशेतीतील उद्योजकता आणि शासनाच्या विविध योजना” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान ०८ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्रीकांत वारूंजीकर यांनी आपल्या व्याख्याना दरम्यान मत्स्यशेतीतील संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
मत्स्यशेती करिता कोणती जागा निवडावी, तळे कसे उभारावे, मत्स्य प्रजाती कोणत्या निवडाव्यात, माश्यांचे संगोपन करत असताना कोणती काळजी घ्यावी. त्याच बरोबर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काय आहे, या योजनेसाठीची पात्रता काय आहे. ही योजना लागू करावायची असल्यास अधिकाऱ्यांशी भेटून प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, या संदर्भात सखोल विश्लेषण केले.
व्याख्यानाचे अध्यक्षपद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी भूषवले. व्याख्यानाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मंदार पाटसकर यांनी करून दिला.
या ऑनलाईन व्याख्यानासाठी १०० हुन अधिक विद्यार्थी, शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय दीक्षित , अग्रणी महाविद्यालय योजनेच्या समन्वयक प्रा. सौ.रुक्मिणी भोसले उपस्थित होते. प्रा. सीमा पोळ यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमास प्रा.भीमदेव गिऱ्हे आणि विभागातील प्राध्यापिकांचे सहकार्य लाभले.