दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२४ | फलटण | सोमवार दि. ०९ सप्टेंबर पासून फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे पूर्ण क्षमतेने कार्यांवित करण्यात आले आहे. फलटण व माण तालुक्यातील दुचाकी संवर्गासाठी दुचाकी (MH-53), चारचाकी (MH- 53A), परिवहन (अवजड वाहने) (MH-53B) व रिक्षा (MH-53C) संवर्गासाठी वाहन मालिका ही संगणकीय वाहन ४.० प्रणाली वरती दिनांक ०९.०९.२०२४ रोजी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फलटण येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांनी फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रथम गाडी नोंदवण्याचा मान पटकावला आहे. शहा यांनी BMW, टोयोटा हायरायडर २ अश्या एकूण तीन गाड्यांचे पासिंग फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून केले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात RTO ऑफिस सुरु करण्यात आले आहे. ऑफिस सुरु झाल्यानंतर ऑनलाईन प्रणालीमध्ये फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नोंद येण्यासाठी वेळ लागला होता. तो पर्यंत फलटण येथील ऑफिस हे सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून सुरु होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नोंद हो ऑनलाईन प्रणालीमध्ये झाल्याने आता फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहे.
याबाबत अधिक बोलताना सागर शहा म्हणाले कि; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कायमच फलटण तालुक्यातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतात. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता सातारा येथील हेलपाटे वाचणार आहेत. यासोबतच वेळेची व पैशाची सुद्धा बचत होणार आहे. फलटण तालुक्याच्या विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कटिबद्ध असून त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले आहे. आता फलटणकर जनता जागृत झाली असून त्याचा परिणाम सुद्धा आगामी विधानसभा निडवणुकीत दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.