अजिंक्यतारा’ कडून २८०० रुपयांचा पहिला हप्ता बँक खाती जमा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २८०० रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. २८०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम १४ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आला असून ७ डिसेंबर अखेर ९७०४० मे टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या उसाला पहिला हप्ता म्हणून २८०० रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण ७ कोटी ३७ लाख ६६ हजार ३५८ एवढी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली आहे. चालू वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून प्रतिदिन ५ हजार मे टन क्षमतेने गाळप सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चतम ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवणार असून उर्वरित पेमेंट सुद्धा वेळेत अदा करण्यात येईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरु असून चालू गळीत हंगामात ९ लाख मे टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरीत्या काम करीत असून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही अजिंक्यतारा कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला उच्चतम दर देण्यास कटिबद्ध आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!