
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साताऱ्यातील सदरबझार येथे जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. हिंदू संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी शहरात एकूण १७ संमेलने होणार आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ७ एप्रिल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हिंदू समाजाचे संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून साताऱ्यातील सदरबझार येथे जिल्ह्यातील पहिले आणि मानाचे ‘हिंदू संमेलन’ १ आणि २ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे, हिंदूंची एकजूट करण्यासाठी सातारा शहरात अशा एकूण १७ संमेलनांची मोठी मालिका आयोजित करण्यात आली आहे.
संमेलनाचा मुख्य उद्देश आणि एकतेचा संदेश
जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ‘हिंदू’ म्हणून एकत्र येणे, पूर्वजांनी दिलेल्या गौरवशाली परंपरा आणि मूल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, राष्ट्रहितावर विचारमंथन करणे आणि सण-उत्सवांचे महत्त्व सांगून धर्माप्रती आदर वृद्धिंगत करणे, हा या संमेलनामागील मुख्य उद्देश आहे. सदरबझार हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा भाग असून, या पहिल्या संमेलनातून दिलेला एकतेचा संदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सदरबझार हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक शंकर माळवदे यांनी व्यक्त केला.
लक्षवेधी शोभायात्रा आणि मातृशक्तीचा उत्स्फूर्त सहभाग
१ एप्रिल रोजी सदरबझार पेठेतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात श्री महिषासुर मर्दिनी आणि श्री हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी लक्ष वेधून घेतले. वासोळे येथील भजनी व कीर्तन मंडळ, ऐतिहासिक शस्त्रविद्या प्रदर्शन आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे शोभायात्रेची रंगत वाढली. लहान मुलांनी ऐतिहासिक महापुरुष आणि रणरागिणींच्या वेशभूषा साकारल्या होत्या. या संमेलनात ५० टक्के हिस्सा असलेल्या ‘मातृशक्ती’ची (महिलांची) उपस्थिती आणि सहभाग लक्षणीय होता. नारायणी समूहाच्या माता-भगिनींनी ‘राम तांडव’ सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
मान्यवरांचे विचारमंथन आणि मार्गदर्शन
२ एप्रिल रोजी झालेल्या मुख्य कार्यक्रमात शाहीर शुभम भुतकर यांनी अंगावर रोमांच उभा करणारा पोवाडा सादर केला.
यावेळी मातृशक्ती सौ. भक्ती डाफळे यांनी महिला आणि मुलींसाठी उपयुक्त, तर पुरुष व युवकांची कानउघाडणी करणारे सडेतोड विचार मांडले. देवदरी (ता. खटाव) येथील कार्तिक स्वामी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य महंत श्री परशुरामजी महाराज वाघ यांनी आपल्या आशीर्वचनातून हिंदू समाजाचे डोळे उघडत एकत्रीकरणाची गरज स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य युवराज कुलकर्णी यांनी संघाची स्थापना, उद्देश आणि हिंदू समाजाने एकत्र का आले पाहिजे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता सर्वांनी हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत राहावे, अशी अपेक्षा समितीचे उपाध्यक्ष डॉ. शंकर गोसावी यांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
या संमेलनास रा. स्व. संघ समरसता मंचाचे प्रांत संयोजक मुकुंद आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये, शहर कार्यवाह रवी गायकवाड, सदरबझार हिंदू संमेलन समितीचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर पानसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

