स्थैर्य, सातारा, दि.८ : दिवाळी आठ दिवसांवर आली असली, तरी फटाके विक्री अथवा बंदीबाबतचा कोणताही ठोस निर्णय जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही. जिल्हा प्रशासनाने कोणताही निर्णय जाहीर न केल्यामुळे फटाके विक्रेते हवालदिल झाले असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी आणलेल्या लाखो रुपयांच्या फटाक्यांचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. प्रशासन कोणतीही भूमिका जाहीर करत नसल्याने फटाका विक्रेते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
नवीन कपडे, फराळ आणि फटाके हे दिवाळीची त्रिसूत्री आहे. यापैकी कपडे खरेदी करण्याची आणि फराळाची तयारी घरोघरी सुरू आहे. या दोन बाबींची तयारी अंतिम टप्प्यात आल्यानंतर वेध लागतात ते फटाके खरेदीचे. आठ दिवसांवर दिवाळी आली असलीतरी जिल्हा प्रशासनाच्या अंतराळी भूमिकेमुळे साताऱ्यातील फटाका मार्केटमध्ये स्मशान शांतता पसरली आहे. देशव्यापी लॉकडाउनचा फटका शिवकाशी येथील फटाका उत्पादनालासुद्धा बसला आहे. लॉकडाउन शिथिल करत शासनाने दिलेल्या आदेशानुसार इतर व्यवसायांप्रमाणेच शिवकाशी येथील फटाके कारखाने सुरू झाले. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी गरजेइतके उत्पादन त्याठिकाणी झालेले नाही. दिवाळीचा हंगाम लक्षात घेत सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांनी सुद्धा दर वर्षीप्रमाणे त्याठिकाणाहून फटाके मागविले. हे फटाके सध्या जिल्ह्यातील फटाका व्यावसायिकांच्या गोदामात पडून आहेत.