स्थैर्य, सातारा, दि. 1 : देगाव फाटा येथील भंडारे हाईट्स येथे सोफा कुशन गादीच्या दुकानाला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांच्या कुशन साहित्याचे नुकसान झाले. दरम्यान आग लागल्याचे समजताच सातारा पालिकेच्या अग्निशामक दल आणि व कूपर कॉर्पोरेशनचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनी ही आग अखेर आटोक्यात आली.
याबाबत माहिती अशी की, देगाव फाटा, सातारा येथे भंडारे हाईटसमध्ये अरुण यादव यांच्या मालकीची सोफा कुशन गादीचे दुकान आहे. आज दि. 1 रोजी सकाळी 9 च्या सुमारास दुकानातील कामगार कुशनवर शिलाई काम करत असतानाच त्या मशीनच्या मोटरमधून ठिणग्या उडून गाद्यांवर व कापसावर पडल्या. त्यामुळे गाद्या पेटू लागल्या. कामगार व मालकने ताबडतोब अग्निशामन दलास संपर्क साधून आगीची माहिती दिली. तसेच न जळलेल्या गाद्या आतून बाहेर काढल्या. जवळपास पाऊण तासाने कुपरची अग्निशमक दलाची आणि त्यानंतर काही वेळाने सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनीही न पेटलेल्या गाद्या बाहेर काढल्या व आग आटोक्यात आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. या दुर्घटनेत कुशनच्या दुकानातील गाद्या व इतर साहित्यासह लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आग लागल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी भंडारे हाईट्ससमोर झाली होती.