सुई व दोरा हे घराच घरपण असणारे नात्यातल खरं जगणं होतं.पायातला काटा काढण्यासाठी टाच गुडघ्यावर घेतली की नुसत्या नजरेनं व सुईनं काम फत्ते होऊन जायचे. सुई व धागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी मागतही नाही,कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तू शिवायची गरज कोणालाही वाटत नाही.सुईनं गरीबीत जगण्याची लक्तरं धाग्याच्या साह्याने शिवून काढली.थोडं तुटलं,फाटलं की जुनं जाणतं माणूस चंचीतून सुई दोरा काढून पापणी पडायच्या आता सुईत दोरा ओवून टाका घालून द्याचय.नेमकं तुटलंय किती हे नजरंने हेरलं की सांधाव किती लागेल.दोरा साधा की तंगूसाचा वापरावा.दोनदा तुणून जमलं का? या अनुभवाच्या जोरावर जाणती माणसं फाटलेलं शिवून द्यायची.
आता जाणत्याची परवड झाल्याने,त्यांच्या आयुष्याच्या चिंध्याला शिवण्यासाठी ना सुई दोरा,कुणाचा आधार.नुसतं नव कापाड अंगावर झुलं टाकल्यावानी अन् लाजं खातरं उसनं अवसान चेह-यावर आणून आतून पार तुटून व फाटून गेलेल्या विदीर्ण मनाला सांगा टाका घालायचा कसा.होतं नव्हंत तेवढं पुढं सोपवलं,जीवाला व प्वाटाला चिमटा घेऊन घटकाभर इसावा न घेता राबलं.फाटकं तुटकं,शिळपाकं खाऊन जगलं.अनेक पै पावणं ,गोतावळा जमवला.थोडंफार तुझं माझं झालं की माणुसकीच्या सुईने व आपलेपणाच्या धाग्याने जोडलं पण तुटू नाय दिलं.
नव्या अन् जुन्या पिढ्यांत अंतर वाढत चाललंय .तवाच्या काळी धागा साधाच पण टिकाऊ होता.त्यातील नात्यांची वीण घट्ट होती.तुटलेले शिवताना ठिगळाला ठिगळ लावताना कमीपणा नवता.तर इज्जत महत्त्वाची होती.मोठ्याल टाके टाकून रंगीबेरंगी काबरून अंगभर सुई धाग्याने तयार हुयाचे.त्यातला आनंद आज हरवत चालला आहे.
आजचा नव्या पिढीतला धागा सुती नसून तंगूस आहे.दिसायला दिखाऊ अन् गळेकापू कामाचा.संगती येणाऱ्याला कापूनच काढणार.दिसणार तर नाय.पण करणीला चुकणार नाही.सुईच अन् नव्या पिढीच सोयीच कामकाज सुरु आहे.नवे धागे जुन्या धाग्याला स्वार्थापायी जवळ करतात.आपला कार्यभाग साधला की धागा तोडून मोळकेच.कामापूरता धागा अन् बाकी दगा.जुन्या जाणत्या धाग्याला हे सारं कळतं पण आपलच दात अन् व्हट बोलता कुणाला.म्हणून ते भी सांधण्याचा प्रयत्न करतं.
वयस्क धाग्याला नव्या सुया टोचून बोलत्यात.शरीरावरील घाव बरं पण हे टोचणं खरंच वेदना दायक आहे.त्यावेळी वयस्क जोडीदार शहणपणाचा सल्ला देऊन त्वांडालाच शिवून टाका.हे सांगून घरातल्या घरात सांधण्याचा प्रयत्न केला जातो. जुनं सुई दोरे जपलं तरच नव्याच येणार नवं टिकेल नायतर चिंधाड्या झाल्याच म्हणून समजावं.जिंदगीच्या चिंधड्या होऊ द्याच नसेल तर सांदाडीला पडलेले सुई दोरे सन्मानाने वागवाव.त्यांच्याशी जुळवून घ्या.
आता सारं जिथल्या तिथं ,सुख सोबतीली,मऊ बिछाना संगतीला ,पाचीपक्वाने खायला पण तुटलेले सांधणारं,समजवणारं,मायेने कुशीत घेणारं नक्कीच हरवलं. सारं असून सुख सुद्धा टोचतय.मनातून करणीची बोचणी अन् टोचणी शांत बसू देत नाही.आधाराने कुणाच्या आधारावर जगायचे अन् बोलायचे.सुई दो-याची व्यवस्थित सोय केल्यास आपणाला काहीच कमी पडणार नाही. पुन्हा एकदा चंचीतील फाटलेली व तुटलेली नातं साधंणारे सुई दोरेवाले हवेतच.नाय तर आपण आता हवेतच.वेळीच आपलेपणाच्या सुई धाग्याने आपली माणसं व नातं जोडू या.