कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना शोधून त्यांना लागू असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ द्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०३: कोविड 19 मुळे पालक  गमावलेल्या बालकांना शोधून त्यांना लागू असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यावा. अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अशा अनाथ झालेल्या बालकांसाठी स्थापित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय  कृती दलाच्या द्वितीय बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणाले, कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांचा विषय अतिशय संवेदनशील आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या जुव्हेनाईल जस्टीस समितीच्या सूचनांप्रमाणे ‘कोविड 19’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच ‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना वेळेत पूर्ण करावयाच्या आहेत.

‘कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा.त्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक दक्ष राहून सहकार्य करावे. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना पात्रतेचे निकष तपासून शासनाच्या विविध निराधार योजनांचा लाभ मिळवून द्यावा.  त्यांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी. बालकांचे शिक्षण व इतर बाबींसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे व त्याकरिता विशिष्ट कार्यपद्धतीत ठरवावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

या वेळी 14 मे 2021 ते 31 मे 2021 पर्यंत झालेल्या कामाचा आढावा  घेण्यात आला. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तिंचे संपर्क शोधून प्रत्येक बाधित मुलामुलीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न चालू आहेत तसेच आरोग्य विभागाकडून मुंबई शहरातील कोविड रुग्णालय, कोविड सेंटर अशा एकूण ६३ रुग्णालय व सेंटरची यादी प्राप्त करून घेऊन, त्यांना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांकडून विहीत नमुन्यात माहिती भरून घेण्यासाठी फॉर्म तयार करून सर्व 63 रुग्णालय  कोविड सेंटर यांना मेल करण्यात आले.  गुगलशीट फॉर्म तयार करून दररोज मृत्यू पावलेल्या रुग्णांची माहीती भरण्यासाठी देण्यात आली. आरोग्य विभागाकडून मार्च 2020 ते 25 मे 2021 पर्यंत कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या १७८३ रुग्णांची यादी प्राप्त करून घेऊन सदर रुग्णांचे नातेवाइकांशी संपर्क साधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत समितीला  एक पालक असलेले १२४ तर ३ अनाथ बालक आढळून आली अशी माहिती  सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती प्रेमा घाटगे यांनी दिली.

बालकांसाठी हेल्पलाइन

कोविड 19 मुळे पालक गमावलेले बालक आढळून आल्यास नागरिकांनी  १०९८ (२४ तास) जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर ०२२-२४९२२४८४ बाल कल्याण समिती, मुंबई शहर १ व २:- ९३२४५५३९७२, ९८६७७२८९९४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

या बैठकीस जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव हितेंद्र वाणी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ.ओमप्रकाश वलेपवार, बृहन्मुंबई महानगर पालिका. डॉ. अश्टुर, बाल कल्याण समिती अध्यक्ष, मिलिंद बिडवई, पोलीस निरीक्षक, स्पेशल पोलीस युनिट श्री.पोखरकर, अँड.ठोसर व श्रीमती जोशी हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!