
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : प. पु. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था, फलटण तर्फे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयातील गुणवंत व गरजू विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, हा या मदतीमागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत दोन्ही महाविद्यालयांतील एकूण ८ विद्यार्थिनींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयातील तृप्ती घाटे, साई पोतेकर, दिशा जगताप, पायल बळीप आणि कृषी महाविद्यालयातील धनश्री शिंदे, तेजल घाडगे, समृद्धी पोमण, ज्ञानेश्वरी साबळे यांचा समावेश आहे.
ही मदत फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, समाधी मंदिर संस्थेचे सचिव सुभद्राराजे नाईक निंबाळकर, विश्वस्त अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कोणत्याही गरजू विद्यार्थिनीने शिक्षणापासून वंचित राहू नये, असे प्रतिपादन सचिव सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, डॉ. एस.डी. निंबाळकर आणि डॉ. यु. डी. चव्हाण यांनी गोविंद महाराज समाधी मंदिर संस्थेचे आभार मानले.