दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । देशाला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपले योगदान दिले. त्यामध्ये अग्रणी असलेल्या महात्मा गांधी यांचे कार्य संपूर्ण भारत देशाला अभिमानास्पद असेच आहे. मात्र; देशासाठी केलेल्या महान कार्याबद्दल ज्या महात्मा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी मिळाली त्या महापुरुषाची अवहेलना फलटण नगरपरिषदेकडून सुमारे गेल्या तीन वर्षांपासून सुरु होती. दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कारणास्तव शहरातील प्रसिद्ध गजानन चौक येथील महात्मा गांधीजींचा पुतळा काढून जवळपास तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. तथापि, काही दिवसांपूर्वी गजानन चौक येथील जुन्या पुतळ्याचा परिसर संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आला असून गजाजन चौकामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
फलटण शहरातील गजानन चौक हा नेहमीच गजबजलेला परिसर असतो. या ठिकाणचा महात्मा गांधीजी यांचा पुर्णाकृती पुतळा या चौकाची विशेष ओळख आहे. नूतनीकरणासाठी पालिकेकडून सदरचा पुतळा काढण्यात आलेला आहे. पालिकेच्या पुढाकारातून पुतळ्याचे नूतनीकरण होत असल्याने सुरुवातीला फलटणकरांनी याचे कौतुकच केले. पण पुतळा काढून तब्बल तीन वर्षे उलटूनही नवीन पुतळा या ठिकाणी बसवण्यात न आल्याने फलटणकरांमधून पालिकेविरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसत होता. याचीच दखल घेत फलटण नगरपरिषदेने गजानन चौक येथे नव्याने तयार करण्यात आलेला महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्याचे कामकाज सुरु केलेले आहे. आगामी किती दिवसात सदरील काम पूर्णत्वास जाते, याचीच चर्चा सध्या गजानन चौकात सुरु आहे.