स्थैर्य ,मुंबई, दि. ०४: राज्यभर चर्चा असलेल्या पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोडांनी 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपला राजीनामा सोपवला होता.
28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यानंतर आज उद्धव ठाकरेंनी राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्यपालांकडे पोहचलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले होते संजय राठोड ?
संजय राठोड यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. याविषयावर बोलताना राठोड म्हणाले होते की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न विरोधीपक्षाकडून केला जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्यावर आरोप लावले जात आहे. पण चौकशी सुरू आहे, या चौकशीमध्ये सर्व सत्य समोर येईल. चौकशी निपक्षपणे व्हायला हवी ‘ असे संजय राठोड म्हणाले आहेत.