
स्थैर्य, पुणे, दि. 25 : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटर बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. याबाबत सोशलमिडियावर जोरदार चर्चा देखील होत आहे. यामुळेच पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भांतील सविस्तर आदेश जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड आयुक्त यांनी काढले आहेत. परंतु पुणे शहरामध्ये अद्यापही सलून, ब्युटी पार्लर सुरु होण्यासाठी किमान एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे शहरामध्ये चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे ३० मे नंतर सलून, ब्युटी पार्लर सुरु करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतेक उद्योग, व्यवसाय आणि दुकाने गेल्या दोन महिन्यांपासून बंद होती. परंतु यामध्ये नागरिकांची सर्वाधिक गैरसोय ही सलून, ब्युटी पार्लर बंद झाल्याने झाली. याबाबत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिर नाराजी देखील व्यक्त केली. अनेकांनी लॉकडाऊन लूक, लॉकडाऊन नंतरचा लूक याबाबत अनेक कोट्या केल्या गेल्या. तर अनेकांनी घरच्या घरीच केस कापणे, दाढी करण्याचे प्रयोग देखील केले. त्यामुळे नागरिकांना सलून, ब्युटी पार्लर कधी सुरु होणार याची मोठी प्रतिक्षा होती. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ मे रोजी केवळ सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरसाठी स्वतंत्र दोन पानी आदेश काढले आहेत. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर सुरु करताना काय खबरदारी घ्यावी, एका वेळी किती ग्राहकांना परवानगी देण्यात यावा, सॅनिटायझरची सोय, निर्जुतिकीकरण आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागात देखील जिल्हाधिकारी नवल किरोश राम यांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी संबंधित व्यावसायिकाला कोणाचीही स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये केवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी लागणार आहे.