दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहरातील कुरेशीनगर येथे बर्याच वर्षांपासून अनधिकृतपणे कत्तलखाना सुरू होता. या कत्तलखान्याचे दि. १६ मार्च २०२४ रोजी फलटण शहर पोलीस प्रशासनाकडून निर्मूलन करण्यात आले आहे, अशी माहिती फलटण शहर पोलिसांकडून देण्यात आली.
दि. ८ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल झाल्याची घटना निदर्शनास आली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जातीची जिवंत जनावरे, मृत जनावरांची शिंगे वगैरे सुमारे रू. २,०५,१००/- चा मुद्देमालज जप्त करून फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जनावरांची अवैध वाहतूक तसेच त्यांच्यावर होणार्या अत्याचाराच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटनांचा आढावा घेता, सन २००३ पासून आजपर्यंत एकूण ३० गुन्हे फलटण शहर पोलीस ठाणे येथे दाखल झाले आहेत. या अवैध व्यवसायांच्या अनुषंगाने कुरेशीनगर येथील अवैध कत्तलखाना वारंवार चर्चेत होता. या ठिकाणावरून फलटण पोलीस ठाण्यातर्फे आजपर्यंत अनेक जिवंत गोवंश जनावरे, गो मांस, जनावरांची शिंगे, जनावरांची कातडी व वाहने जप्त केली होती. या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसुध्दा करण्यात आली होती; परंतु त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसलेला नव्हता.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. १६ मार्च २०२४ रोजी कुरेशीनगर, फलटण शहर येथील अनधिकृत कत्तलखान्याचे पोलीस प्रशासनाकडून निर्मूलन करण्यात आले आहे. यासाठी दोन जेसीबींच्या सहाय्याने अनधिकृत कत्तलखान्याचे बांधकाम तोडण्यात आले. या कारवाईसाठी कुरेशीनगर येथील मान्यवर व अन्य रहिवाशांची सहमती घेण्यात आली होती.
या निर्मूलनावेळी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे यांच्यासह फलटण शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक आणि वाहतूक शाखेच्या अंमलदारांसहित एकूण २६ पोलीस अंमलदार आणि आरसीपी पथक यांनी भाग घेतला. या निर्मूलनावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.