स्थैर्य, फलटण दि.22 : सातारा जिल्हा पत्रकार संघ ही अत्यंत आक्रमक संघटना आहे. जिल्ह्यातील कुठल्याही पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार झाला तर आम्ही हल्ल्याला प्रतीहल्ल्याने उत्तर देत असतो; असा इशारा सर्व अपप्रवृत्तींना उद्देशून देऊन जिल्ह्यातील कोणताही पत्रकार असुरक्षित नाही. असा अनुचित प्रकार कोणत्याही पत्रकाराच्या बाबतीत झाला तर आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू; अशी रोखठोक भूमिका सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी पत्रकार प्रशांत रणवरे धमकी प्रकरणात आरोपीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
जिंती, ता.फलटण येथील पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळूमाफियांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर फलटण पोलीसांकडून आरोपीविरोधात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पत्रकार संरक्षण कायद्यान्वये संबंधित आरोपीविरोधात कारवाई करण्यात पोलीस प्रशासन टाळाटाळ करत होते. याची दखल घेऊन सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमूख दिपक शिंदे, इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार संघाचे तुषार तपासे, जिल्हा निमंत्रक सनी शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक सुजित आंबेकर, राहूल तपासे, ओंकार कदम, संतोष नलवडे, अमित वाघमारे, समाधान हेन्द्रे यांच्यासह फलटण व सातारा येथील पत्रकारांनी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांची सातारा येथे भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. जिल्हा पोलीस प्रशासनाने संबंधित घटनेची तात्काळ दखल घेऊन आरोपी विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर हरिष पाटणे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
हरिष पाटणे पुढे म्हणाले, धमकीच्या प्रकारामुळे व फलटण पोलीसांकडून गुन्हा नोंद करण्यात झालेल्या टाळाटाळीमुळे प्रशांत रणवरे निराश झाले होते. त्यांनी आत्महत्येचा विचारही व्यक्त केला होता. नैराश्यातून बेपत्ता झालेल्या प्रशांत रणवरे यांचा फलटणच्या पत्रकारांनी शोध घेवून त्यांना पाठबळ दिले. त्यांना सातारला आणून आम्ही सर्वांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना घडलेला प्रकार निदर्शनास आणून दिला. या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्या त आला. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी याची गंभीर दखल घेत अवघ्या 2 तासात वाळू माफियावर गुन्हा दाखल करुन अटक केली याबद्दल पोलीस प्रशासनाला पाटणे यांनी धन्यवाद देखील दिले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, वाळू माफियांना यंत्रणा, राजकारणी सामील असतात त्यामुळे त्यांच्याकडून असे प्रकार होत असतात. पत्रकारांना, सामान्यांना काहीही त्रास झाला तरी राजकारण्यांना, प्रशासनाला त्याचे काहीच देणे घेणे नसते याचा वारंवार अनुभव आम्हाला येत असतो. वाळू माफियाने प्रशांत रणवरे यांच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही आमची ताकद दाखवून देवू. आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते. फलटण पोलीसांनी या प्रकरणात कुचकामी प्रकार केला आहे. त्यांनाही सातारच्या पत्रकारांची ताकद काय आहे ते यातून कळेल. कुठल्याही वाळू माफियाने असा प्रकार पुन्हा केल्यास त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिला.
प्रा.रमेश आढाव म्हणाले, पत्रकार प्रशांत रणवरे यांना झालेल्या दमदाटी विरोधात आम्ही फलटणचे सर्व पत्रकार पोलीस ठाण्यात गेलो असता आम्हाला फलटण पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. मात्र सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून हा प्रश्न आता निकाली लागला असल्याचे सांगून याबद्दल फलटण तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांना प्रा.रमेश आढाव यांनी धन्यवाद दिले.