स्थैर्य, मुंबई, दि.५: राज्यपालांच्या गुरुवारच्या बैठकीनंतर कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पूर्वीप्रमाणे ३ तासांची होणार नाही. यंदा ती ५० गुणांचीच आणि १ तासाची असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. यानंतर मंत्री सामंत यांनी कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या, याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक घेतली होती. परीक्षा पद्धतीबाबत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. कुलगुरूंच्या समितीकडून अहवाल आला असून तो विद्यापीठाकडे पाठवण्यात येईल.
परीक्षा घेण्यासाठी कुलगुरू समितीच्या मुख्य शिफारशी
– विद्यार्थी घरी बसून परीक्षा देतील असे नियोजन करा. पद्धती व वेळापत्रक ७ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावे.
– प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान घ्याव्यात. परीक्षा कमी कालावधीच्या ऑनलाइन घ्याव्या. जिथे ऑनलाइन शक्य नसेल तिथे ऑफलाइन घ्याव्यात. एमक्यूआर, ओपन बुक, असाइनमेंट बेस असे पर्याय वापरून परीक्षा घ्यावी.
– कौन्सिल, परीक्षा बोर्ड यांनी पर्याय शासनाला कळवावा. प्रात्यक्षिक परीक्षा व व्हायवासाठी स्काइप, अन्य मीटिंग अॅप्स किंवा टेलिफोनचा वापर करावा.
– ३१ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठांनी निकाल जाहीर करावेत. याची माहिती लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कळवावी.