अंतिम वर्षांच्या परीक्षा:विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि. ३: मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना पडलेला परीक्षेबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ‘अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देता यावी, असा आमचा आग्रह होता. या आग्रहाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे’, अशी उदय सामंत यांनी दिली.

राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा केव्हा आणि कशाप्रकारे घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात बैठक पार पडली. यावेळी मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकरदेखील आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, ‘घरात बसून परीक्षा घेण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन, असे अनेक प्रकार आहेत. याबाबतचा अंतिम अहवाल तयार करुन उद्या शासनाकडे पाठवला जाईल.’

‘आम्ही मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन युजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करू.ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करू. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्नही असेल, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही यूजीसीकडे देऊ’, असे उदय सामंत म्हणाले.

‘परीक्षा कशाप्रकारे घ्यायच्या हा निर्णय कुलगुरु आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. सरकार म्हणून आमचा त्यांना पाठिंबा होता. मात्र, फिजिकली परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात येणार आहेत. पण, परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेणार, याबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल,’ असेही उदय सामंत यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!