दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२३ । सातारा । येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस व म. गांधी यांना समाजातील विघ्नसंतुष्टांकडूनच मारण्यात आले. बंद डोळे, बंद कान, खाली मान, सावधान आणि तुम्हालाही सलाम हे समाजाचे वास्तव दाखविण्यासाठी मी चित्रपटाची निर्मिती केली, क्रांतिकारकांचा विचार पोहोचविण्यासाठी क्रांतिपर्व सिनेमाची संहिता लिहिली, दुष्काळनिर्मूलनाचे काम करीत असतानाच खेळ, कुस्ती आणि सिनेमाचीही परंपरा जपली असल्याचे प्रतिपादन अभिनेता विलास रकटे यांनी केले.
वाई येथील स्वातंत्र्यसैनिक शंकरराव जेजूरीकर यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त जेजुरीकर प्रतिष्ठानतर्फे दि. ५ मे रोजी विलास रकटे यांना संत गाडगे महाराज पुरस्काराने जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते.
श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक अशा श्रेष्ठ अभिनेत्यांसोबत काम केलेल्या रकटे यांनी बिराजदार, मारुती माने, मारुती वडार यांच्याबरोबर कुस्तीचे सामनेही खेळले. कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेल्या रकटे यांनी प्रतिकार, सामना, प्रतिडाव अशा ५० हून अधिक मराठी चित्रपटांत, तसेच नाटक आणि हिंदी चित्रपटांत ताकदीने भूमिका साकारल्या. मुलाखतीमध्ये त्यांनी अन्यायाविरोधात लढणारा नायक उभा करून प्रतिकार चित्रपटाच्या निर्मितीचा आपला चंदेरी प्रवास सांगत पडद्याबाहेरील प्रतिकूल जगणेही मांडले. या वेळी त्यांच्या पत्नी अरुणा रकटे व त्यांच्या भगिनी राजश्री पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
मुलाखतीच्या माध्यमातून रकटे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. प्रतिसरकार चळवळ व चलेजावची चळवळ यावर तसेच क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी , क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा जीवनपट उघडून दाखवणारा क्रांतीपर्व हा चित्रपट लिहून तयार आहे. त्याला जर कोणी निर्माता मिळाला तर तो हिंदीतल्या शोले इतकाच मराठी चित्रपटसृष्टीही गाजवून सोडेल याची मला खात्री आहे असेही विलास रकटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दरम्यान सकाळी स्वातंत्र्यसैनिक जेजुरीकर यांच्या समाधीस्थळी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पुष्पचक्र वाहिले. पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रास्ताविक शामराव कर्णे यांनी केले, सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी तर आभार विनायक जेजुरीकर यांनी मानले. कार्यक्रमाला वाई परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.